सातारा : येथील मंगळवार पेठेतील गोपाळ वायदंडे यांच्या घरावर पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मध्यरात्री झाड कोसळले. सुदैवाने घरावरील पत्र्याने तग धरल्याने जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार पेठेमध्ये गोपाळ वायदंडे हे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याकडेला असलेले झाड उन्मळून अचानक वायदंडे यांच्या घरावर पडले. झाड पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने वायदंडे कुटुंबीय झोपेतून जागे झाले. फांदी जोरदार आदळल्यामुळे घराचा पत्रा फाटला गेला. मात्र, तरीही पत्र्याने तग धरल्याने घरातील लोक सुरक्षित राहिले. या प्रकारानंतर पेठेतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रविवारी सकाळी घरावर कोसळलेले झाड कापून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.