म्हसवड (जि. सातारा) : रणरणत्या उन्हात डोंगर कपारीमधून अवजड अशा कावडी घेऊन ‘हर हर महादेव’चा जयघोष करत शिवभक्तांनी मंगळवारी शिखर शिंगणापूर येथील अवघड असा मुंगी घाट सर केला. मानाच्या कावडीतील जलाने शिवलिंगाला जलाभिषेक घालून यात्रेची सांगता झाली.शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावड यात्रा शिवमंदिरात गुढी उभारून सुरू झाली. हळदीच्या कार्यक्रमानंतर ध्वज बांधला. त्यानंतर इंदौरचे काळगौडा राजे यांनी सोमवारी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी कावडी मुंगी घाटातून वर येऊ लागल्या. सह्याद्री पर्वत रांगातील शिखर शिंगणापूर हा अखेरचा डोंगर. येथे खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ या पंचक्रोशीमधून मोठ्या संख्येने कावडी येतात. या कावडी तांब्याचे दोन हंडे, त्यावर उंच झेंडा, त्याला विविध रंगाचे कपडे लावून सजवल्या. उन्हात मुंगी घाटातून महादेवाचा धावा करत वर येत होत्या. सायंकाळी दोरखंड व मानवी साखळीच्या आधारे या कावडी मुंगी घाटातून वर येतात. राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत कावडी धारकांचे स्वागत करण्यात आले.>कावड मिरवणुकीपुढे ढोल-ताशे, सनई, हलगी या वाद्यांचा गजर सुरू होता. कावड खांद्यावर घेऊन नाचवली जात होती. कावडी महादेवाच्या मंदिरात दाखल होऊन कावडीमधून नीरा नदीसह पंचनद्यांच्या आणलेल्ल्या जलाने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी हजारो भविक उपस्थित होते.
जलाभिषेकानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 5:06 AM