फलटण : चार-पाच महिन्यांपासून निंबळक (ता. फलटण)चे ग्रामस्थ बिबट्यामुळे भयग्रस्त झाले होते. त्याचा कुठेतरी विसर पडतो ना पडतो तोच, रानगवा गावात शिरल्याने ग्रामस्थांची भंबेरीच उडाली आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी निंबळक गावाच्या पश्चिमेकडून रानगवा गावात शिरत असल्याचा संदेश निंबळकचे पोलीसपाटील समाधान कळसकर यांना आल्यानंतर त्यांनी तातडीने गावाच्या पश्चिम बाजूकडे धाव घेतली असता, काही अंतरावर सावंत यांच्या शेतातून रानगवा गावाकडे येताना त्यांना दिसल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी सतर्कतेने लोकांना माहिती दिली.
या परिस्थितीची माहिती पोलीसपाटील यांनी मोबाईलवरून गावातील तरुणांना सांगितली असता, अनेक तरुण जमा होऊन रानगवा असल्याच्या ठिकाणाकडे मोठ्या संख्येने दाखल झाले. गर्दी व गोंगाट ऐकून रानगवाही सतर्क झाला आणि कॅनाॅलमधील पाण्यात उडी मारून बोडकेवस्तीकडून बरडच्या दिशेने निघून गेला. रानगवा एकटा होता की त्यांचा कळप होता, हे समजू शकलेले नाही. जर रानगव्याची माहिती मिळाली नसती तर रात्री शेतकऱ्यांच्या जनावरांना त्याचा त्रास झाला असता, असे अनेक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
गेले अनेक महिने निंबळक ग्रामस्थांना बिबट्याने दर्शन दिले होते, आता तर प्रत्यक्षात रानगवा दिसल्यानंतर, आणखी काय दिसणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तसेच पुन्हा रानगवा येतोय की काय, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेस शेतात जाताना सावधगिरी बाळगण्याची सूचना ग्रामस्थ एकमेकांना करताना दिसत आहेत.