भुर्इंज : तासगावहून पुण्याला जाणाऱ्या एसटीत सातारमध्ये एक तरुणी बसली. बसमध्ये गर्दी. केस, दाढी पिकलेल्या वयस्कर प्रवाशाशेजारी ती बसली पण त्यानेच बस सुरु होताच काही वेळात तिच्याशी अश्लील चाळे सुरु केले. तिने समजही दिली, पण त्यानंतरही त्याने कृष्णकृत्य सुरुच ठेवल्याने संतप्त झालेल्या तरुणीने रुद्रावतार धारण करुन त्याच्या कानाखाली आवाज काढला. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच काळ सोकावता कामा नये म्हणून बस भुर्इंज पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तरुणीचा आवाज बुलंद करत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवाशांनी पोलिसांना साकडे घातले. सातारा स्थानकात तासगाव-पुणे बसमध्ये (एमएच १४ / ३0६९) ही तरुणी बसली तिच्या शेजारी बसलेल्या इस्माईल अब्र्राहिम अत्तार (वय ५२, रा. शिरवळ) याने त्या तरुणीच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहात; नीट वागा,’ असे तरुणीने सुनावले. काही काळ शांत बसून अत्तार याने आनेवाडी टोलनाका ओलांडताच पुन्हा तेच चाळे सुरू केले. तरुणीने जागा बदलली. पण या कृत्याचा प्रचंड संताप तिच्या मनात होता. या व्यक्तीला असेच सोडले तर तो इतर मुलींशीही असेच वागेल, असा विचार तिने केला. तोपर्यंत भुर्इंज जवळ आले. तिने त्याला जाब विचारल्यावर त्याने तिलाच दुरुत्तर केले. मग मात्र संतप्त तरुणीने त्याच्या कानाखाली आवाज काढला. नेमके काय घडले हे जेव्हा प्रवाशांच्याही लक्षात आले तेव्हा प्रवाशांनीही त्याला फैलावर घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहक प्रताप सीताराम माने आणि चालक दत्तात्रय खाडे यांनी बस जोशी विहीर येथील महामार्ग वाहतूक शाखेत आणली. तेथे त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला भुर्इंज ठाण्यात जावे लागेल. प्रवासी म्हणाले, ‘आम्हाला उशीर झाला तरी चालेल; पण याला पोलीस ठाण्यात न्याच.’ बस माघारी फिरवून भुर्इंज ठाण्यात आणण्यात आली. प्रवाशांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अत्तार याला ताब्यात घेऊन प्रवाशांचे जबाब नोंदवले. एकाही प्रवाशाने उशीर होत असल्याची तक्रार केली नाही. (वार्ताहर)‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे बळ‘लोकमत’शी बोलताना ती तरुणी म्हणाली, ‘वयस्कर व्यक्तीकडूनही जर मुलींनना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. तक्रार देण्याच्या माझ्या निर्णयाला सर्व प्रवााशांनी सहकार्य केले हीच मोठी गोष्ट आहे.’ ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचाही तिने आवर्जून उल्लेख केला. ‘एकट्या तरुणी, महिलांवर काय प्रसंग ओढवतात याचा अनुभव त्यातून प्रखरपणे समोर आला आहे. ‘लोकमत’ने जे मांडले त्यापासून प्रेरणा घेऊन लढण्याचे बळ आल्याचे तिने सांगितले.
युवतीच्या छेडछाडीनंतर एस.टी. थेट पोलीस ठाण्यात!
By admin | Published: February 18, 2015 10:44 PM