खंडाळा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देवून मंत्री छगन भुजबळ आणि रूपाली चाकणकर यांनी अभिवादन केले. मात्र, या अभिवादनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक घालून दोघांचाही निषेध केला.ज्या मनुवादी विचारांनी एकेकाळी फुले दांपत्याला प्रचंड विरोध केला होता. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात वर्णवादी अडसर केला होता, त्यांचा शक्य तेवढा अपमान केला. अशा विचारांच्या लोकांसोबत केवळ सत्तेच्या आणि आपले अपराध लपविण्याच्या वैयक्तिक लालसेपाई बसलेल्या लोकांना या स्मारकावर येण्याचा नैतिक, सामाजिक अधिकार नाही. हे स्मारक पवित्र आहे, आमचे शक्तिस्थळ आहे. संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे हे स्थान आहे. या लोकांनी अभिवादन केल्यामुळे या स्मृतीस्थळाच पावित्र्य राखले जावे यासाठी दुग्धाअभिषेक करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.विचारांची गद्दारी करणाऱ्यांनी पुढील वर्षी येताना इतिहासाचे वाचन करून यावं तसेच ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ वाचावी असाही सल्ला देण्यात आला. या आंदोलनात दत्तात्रय (बंडू) ढमाळ , युवराज ढमाळ ,मतिन शेख , अमिर काझी,किरण राऊत , शरद जाधव, अमोल जाधव हे सहभागी झाले होते. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.
Satara: मंत्री भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घातला पुतळ्यास दुग्धाभिषेक
By दीपक शिंदे | Published: January 03, 2024 5:33 PM