संतोष गुरव।लोकमत न्यूज नेटवर्कक-हाड : कोरोनाची बाधा झाली की, त्या व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. एका वेगळ्याच दृष्टिकोनातून त्या रुग्णाकडे पाहिले जाते. तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही वाळीत टाकण्याच्या घटना काही ठिकाणी घडत आहेत. मात्र, तीच व्यक्ती जेव्हा कोरोनामुक्त होऊन घरी परतते तेव्हा तिला सर्वात जास्त आधार हा डॉक्टरांकडून दिला जातोय. तसेच पुष्पगुच्छ देत टाळ्या वाजवून मनोधैर्य वाढविले जात आहे. अशा व्यक्तींना आज समाजाने धीर देणे गरजेचे आहे.
क-हाड तालुकाही अशा घटनांना अपवाद राहिलेला नाही. मात्र, तालुक्यात उत्तम उपचारपद्धत, मनोधैर्य वाढविणारे डॉक्टर्स अन् सर्व सुविधांनियुक्त असलेले रुग्णालय असल्याने येथे दहा महिन्यांच्या बाळापासून ते ८७ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने कोरोनावर विजय मिळवलेला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्त होण्यासाठी मानसिक शक्ती, इच्छाशक्ती अधिक बळकट करण्याची जरुरी आहे. या रोगाचे गांभीर्य निश्चितच लक्षात घेऊन उपाययोजना करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर आपण रोगमुक्त होऊ शकतो, याचा अभ्यासपूर्वक विचार आणि त्या अनुषंगाने त्वरित कृती करण्याची अधिक जरुरी आहे.
अनेकदा मनातील भीतीमुळे आपल्याला मानसिक पातळीवर थकवा यायला सुरुवात होते. आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक क्षमतेवर, रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ लागतो. मनातील भय आपल्यावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या रोगाला अभय देत असते. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक त्या औषधोपचाराची जशी जरुरी असते, तशीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मानसशास्त्रीय समुपदेशनाची देखील आवश्यकता असते.
प्रत्येकाच्या मनातील भय संपणे गरजेचे असते. कोरोनाने जगभरात दहशत पसरवली आहे. घरात बसले तर पोटाची चिंता आणि बाहेर पडले तर रोगाची भीती, अशा कात्रीत सर्वसामान्य माणूस सापडला आहे. अनेकांना भीती, तणाव, चिंता, नैराश्याने ग्रासले आहे. अशा नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून समुपदेशन करणे गरजेचे आहे.
राज्यात सध्या ३० समुपदेशक, २८ मनोविकार तज्ज्ञ, ३६ मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून समुपदेशनाचे काम केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: २ ते ३ पथके नेमण्यात आली असून, त्यांच्याकडून समुपदेशन करण्यात येत आहे.
आत्तापर्यंत बाराजण झालेत कोरोनामुक्त !कृष्णा रुग्णालयातून आतापर्यंत तांबवे येथील ३५ वर्षीय युवक, डेरवण येथील अवघे १० महिन्यांचे बाळ, म्हारुगडेवाडी येथील ७८ वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील २८ वर्षीय युवक, बाबरमाची येथील ३२ वर्षीय युवक, चरेगाव येथील ३० वर्षीय युवक, आगाशिवनगर येथील ८७ वर्षीय वृद्ध व्यक्ती, मूळ कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील; पण सध्या आगाशिवनगर येथे राहणारा ३३ वर्षीय युवक, वनवासमाची येथील ३ वर्षीय मूल आणि ५७ वर्षीय गृहस्थ, तसेच रेठरे बुद्रुक येथील ४२ वर्षीय गृहस्थ आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील ४८ वर्षीय गृहस्थ अशा एकूण १२ जणांना कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने अथक परिश्रम घेत कोरोनामुक्त केले असून, या सर्वांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे.
१० महिन्याचे बाळ ते ८७ वर्षीय पेशंट कोरोनामुक्त...
कृष्णा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये डेरवण येथील सर्वात लहान रुग्ण म्हणजेच १० महिन्याचे बाळ आणि आगाशिवनगर येथील सर्वात वयोवृद्ध म्हणजेच ८७ वर्षीय गृहस्थ यांचा समावेश आहे. या दोघांनीही कृष्णा रुग्णालयात सोबतीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. अन्य काहीजण कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.
सध्या कृष्णा रुग्णालयात ४० हून जास्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, हे सर्व रुग्ण लवकर बरे व्हावेत, यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्याचशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तरी त्या रुग्णांना सामावून घेऊन, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यास आमची यंत्रणा सक्षम आहे. कोरोनावरील उपचारासाठी आपण स्वतंत्र तज्ज्ञ स्टाफ तैनात आहे.- डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट.