दत्ता यादव
सातारा : चोरी करताना त्याच्या हाती चक्क रायफल लागली. यासोबत १४ गोळ्याही. अगोदरच त्याच्या मनात रुजत चाललेल्या गुन्हेगारीला या रायफलमुळे साहजिकच हत्तीचे बळ आले. यामुळे अक्षरश: त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. कधी वाटत होतं दरोडा टाकू तर कधी वाटत होतं याला मारू. अशा एक ना अनेक त्याच्या मनात आलेल्या विचारांचं वादळ पोलिसांच्या कामगिरीमुळं अखेर शमलं गेलं.
सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर संजय जातक हे आपल्या मूळगावी सातारा तालुक्यातील वर्णे येथे राहतात. त्यांचा मुलगा साताऱ्यातील संभाजीनगरमध्ये वास्तव्याला आहे. त्यांच्या मुलाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण पवार (वय १९) आणि संगीता राठोड (वय ३०, रा. उडगी, ता. बागेवाडी, जि. विजयपूर, कर्नाटक) या बहीण-भावाला भाड्याने खोली दिली होती. मात्र, एके दिवशी अचानक हे दोघे शेजाऱ्याकडे घराची चावी देऊन गावी निघून गेले. दीड महिना जातक यांचे घर बंदच होते. दोन दिवसांपूर्वी ते साताऱ्यात आले. तेव्हा त्यांच्या घरातून रायफल आणि काही साहित्य चोरीस गेल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा खरंतर पोलीसच हादरून गेले. कारण रायफलसोबत १४ गोळ्याही होत्या.
एक गोळी एक मर्डर, असं पोलिसांच्या शब्दात याचं वर्णन केलं जातं. मनात आणलं तर तो चाेरटा या घातक शस्त्राने १४ जणांचा जीवही घेऊ शकतो. अशी हुरहूर पोलिसांच्या मनात लागून राहिली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रंदिवस तपास सुरू ठेवला. कोणतेही पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचा पत्ता, अशी काहीही माहिती नसताना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या शाखेच्या टीमनं अखेर या भावंडांना शोधून काढलेच; पण वेळ न दवडता त्यांच्याजवळची रायफल पहिल्यांदा पोलिसांनी जप्त केली. तेव्हा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अन् ‘तो’ डोळ्याला डोळा भिडवू लागला... प्रवीण पवार हा साताऱ्यातील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. कामावेळी आपल्या सहकाऱ्यांशी तू-तू मै-मै झाल्यास तो मान खाली घालून बसत होता. पण, जेव्हा त्याच्या हाती रायफल लागली. तेव्हापासून तो डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. त्याचं अचानक बदलेलं रूप सहकाऱ्यांच्या चटकन लक्षात आलं. मारेन, बघून घेईन, अशी भाषा त्याची बदलली. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्याच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्याचं मन भरकटत होतं, असं त्यानं कबूल केलं. कधी वाटत होतं दरोडा टाकू तर कधी वाटलं होतं याला मारू. हे धगधगतं हत्यार त्याच्या हाती लागल्यानं भविष्यात त्याच्या हातून काहीही विपरीत घडलं असतं.
फोटोचा मोह नाही आवरला..रायफल चोरी केली तेव्हा ही रायफल सुट्या भागांमध्ये होती. पण, अशिक्षित असलेल्या प्रवीण पवारने घरी गेल्यानंतर ही रायफल पुन्हा जशीच्या तशी जोडली. त्यानंतर त्याला या रायफलसोबत फोटो काढण्याचाही मोह आवरला नाही. अगदी ऐटीत त्याने फोटो काढून स्वत:च्या मोबाईलमध्ये ठेवले.
बहिणीचा काय ‘रोल’प्रवीणची बहीण संगीता राठोड ही नांदत नाही. त्यामुळे ती प्रवीणसोबत कामाला साताऱ्याला आली. त्या दिवशी या दोघांनी मिळून माजी सैनिकाच्या घरात चोरी केली. तेव्हा संगीता त्याच्यासोबत होती. त्यामुळे तिलाही या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलीय.