खटाव : कोरोनाच्या आगमनानंतर त्याचा प्रसार थोपविण्याकरिता गावोगावचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले होते. खटावचा आठवडी बाजार तब्बल दहा महिन्यांनंतर सुरू झाल्यामुळे शेतकरी, ग्राहक, व्यापारी यांच्याकडून आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू सर्वत्र बाजार भरवण्यास सुरुवात झाली. मंगळवारी भरणारा आठवडी बाजार नियमित भरवावा याकरिता ग्रामस्थांतून मागणी होत होती; परंतु ग्रामपंचायतीने अत्यंत सावध पवित्रा घेतला होता. कोरोनाचे सावट व लोकांच्या मनात असलेली भीती निवळू लागल्यानंतर ग्रामपंचायतीने आठवडी बाजार कोरोनाचे सर्व नियम पाळून भरवण्यास परवानगी दिली. आणि अखेर खटावचा आठवडा बाजार गजबजला.
स्थानिक, तसेच बाहेरून येणाऱ्या शेतकरी व व्यावसायिकांची रेलचेल, तसेच ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता या आठवडी बाजारात कमालीचा उत्साह व आनंद दिसून येत होता; परंतु अद्याप कोरोना पूर्णपणे गेला नसल्यामुळे काही ग्राहकांनी गर्दी टाळण्याकरिता सुरुवातीलाच बाजार करण्यास महत्त्व दिल्याचे दिसून येत होते. त्यातच संक्रांतीच्या सणापूर्वीचा बाजार असल्यामुळे बाजारात गर्दी झाली होती.
कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. आतापर्यंत सर्वांनीच नियमांचे पालन केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामस्थांतून आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी होत होती; परंतु सुरू करताना त्याचे योग्य नियोजन व कोरोनासंदर्भातील सर्व नियम व अटींचे पालनही होणे तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे उशिरा का होईना बाजार भरवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आल्याचे खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी सांगितले.