फलटण : बलकवडी प्रकल्पग्रस्थांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी धोम-बलकवडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. १६ पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी,(ठाकुरकी) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संपत कळंबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पुनर्वसित गावांना महसुली दर्जा देणे, पुनर्वसित गावठाणातील सातबारा वरील मूळ स्थानिकांचे नाव कमी करून संबंधित पुनर्वसित गावाचे नाव दाखल करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनीचे नकाशे फेर करून मिळावे, त्यांच्या प्रति कब्जेपट्टी सह मिळाव्यात, सातबारा खाते निहाय विभक्त करून मिळावे, दळणवळण व जाण्या-येण्यासाठीचे रस्ते करण्यात यावेत, वहिवाटीचे अडथळे दूर व्हावेत, वाटप जमीन प्रकरणात मूळ मालक यांचेकडून शासनाकडे दाखल प्रकरणासाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना प्रतिवादी न करता शासन यंत्रणेला करावे, या आणि अशा १९ मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते.वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी फोन वरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधत दिनांक २९ मार्च रोजी मागण्या संदर्भात विशेष सभेचे आयोजन केले असल्याचे पत्र दिले. यावेळी वाईचे तहसीलदार वैभव पवार हे उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांनी धरणग्रस्त संघटनेची मिटिंग दि. २९ रोजी घेण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. तर फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव तसेच खंडाळा तहसीलदार यांच्या वतीने दि. २३ मार्च रोजी मागण्यासंदर्भात मिटिंग घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.धोम-बलकवडी धरणग्रस्त पुनर्वसित संघटना यांच्या आंदोलनास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन कांबळे, वाखरीचे सरपंच तुकाराम शिंदे, उपअभियंता धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई संजय खांडेकर ताकवले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी उपोषण स्थळी भेट दिली.फलटण शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने उपोषणस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. उळूब (फरांदवाडी ), गोळेवाडी (वाठार -निंबाळकर ) गोळेगाव (ठाकुरकी ) जोरगाव (कुरवली खुर्द ) जोर (वाखरी ) ता. फलटण, गोळेगाव (लोणंद, ता. खंडाळा ), आदी पुनर्वसित गावातील नागरिक उपोषणात सहभागी झाले होते.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित
By दीपक शिंदे | Published: March 18, 2023 2:28 PM