लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तब्बल बारा दिवस चाललेले रयत सेवकांचे उपोषण गुरुवारी स्थगित करण्यात आले. रयत सेवकांच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही होण्यासाठी ३० दिवसांचा अवधी द्यावा असे संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित सेवकांच्या त्रुटी पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे पाठवावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संस्था कार्यालयासमोर सेवकांनी बेमुदत उपोषण, धरणे, आमरण उपोषण घंटानाद आंदोलन २१ सप्टेंबर पासून सुरू केले होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, ॲड. दिलावर मुल्ला यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सेवकांचे प्रश्न समजून घेतले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, आणि संघटक डॉ. अनिल पाटील यांनी उपोषण करते सेवक यांच्या मागण्या संदर्भात संस्था कार्यालयात सकारात्मक चर्चा केली.
संस्थेचे सहसचिव ज्ञानदेव मस्के, सहसचिव बंडू पवार, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कनिष्ठ शिक्षक महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते उपोषण करते शरद इवरे, सागर खोमणे, मेघाराणी गुरव व अजूनुद्दीन पठाण यांनी नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले. या प्रसंगी आंदोलक सेवक उपस्थित होते.