सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर कोयना धरण १०० टक्के भरले. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे एक फुटाने उचलून साडे नऊ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. तर पश्चिम भागात मागीलवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही मोठी धरणे भरल्यातच जमा आहेत. तर कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. दोन वर्षानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरले. तर बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून ९ हजार ५४६ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या पायथा वीजगृहातूनही २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. धरणातून एकूण ११ हजार ६४६ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
नवजाला ८९ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ८९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनेला ४८ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे ५ हजार ९९५, कोयना ५ हजार ७६ आणि महाबळेश्वरला ५ हजार ७७४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
कोयनेत गतवर्षी ९५ टीएमसीपर्यंतच साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नव्हती. कोयना धरणात ९५ टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झाला होता. पण, यावर्षी कोयना धरण भरल्याने सिंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच वीजनिर्मितीसाठीही अडचण येणार नाही