सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी पोवई नाका येथे पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. तसेच आमदार पडळकर यांना साताºयातील रस्त्यावर फिरू देणार नाही, असा असा इशाराही देण्यात आला.आमदार पडळकर यांनी केलेल्या जहाल टीकेनंतर राष्ट्रवादी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. राष्ट्रवादी भवनासमोर गुरुवारी आमदार पडळकर यांच्या पुतळ्याला लाथा मारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवनापासून पोवई नाक्यापर्यंत मोर्चा काढला.
यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र स्वरुपाच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे कार्य संपूर्ण जगाला माहिती आहे. पवार यांच्या विरोधात बोलण्याची पडळकर यांची पात्रता नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली.पोवई नाका येथे आमदार पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आग विझविली. कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला देखील जोडे मारले. पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून सर्व प्रतिमा ताब्यात घेतल्या. तेव्हा पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवाध्यक्ष तेजस शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.