सातारा : बदलत्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जग एकत्र आले आहे. या तंत्रज्ञानाची जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती चांगलीच असेल असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजू तसेच संस्कार शिदोरी देणाऱ्या महाविद्यालयीन भिंतीच्या बाहेरील जग याबाबत विद्यार्थ्यांनी अखंड सावधान राहायला हवे, असे प्रतिपादन शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार गीतांजली ननावरे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल, भोळी येथे भरोसा सेलअंतर्गत पोलीस काका, पोलीस दीदी, सुरक्षित अस्पर्श, असुरक्षित स्पर्श या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिरवळ पोलीस ठाण्याच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यावेळी बोलताना गीतांजली ननावरे म्हणाल्या की, अनोळखी व्यक्तीकडून असभ्य वर्तन झाल्यास आपण काय केले पाहिजे, याबाबतची माहिती महाविद्यालयीन युवतींना असणे आवश्यक आहे. याबाबत अस्तित्वात असलेले विविध कायदे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. अशाप्रकारच्या अनेक परिसंवादांचे प्रसारण गुगल मीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, परिसरातील विविध विद्यालयांतील मुख्याध्यापकांकडून अशा परिसंवादाचे आयोजन करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी परिसंवादास विद्यालयातील शिक्षक एस. एस. जाधव, एन. तनपुरे, डी. एम. माने, एस. एस. खडके यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद चव्हाण, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे हरिश्चंद्र लीमन, यशवंत आप्पा चव्हाण, सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते.