लोकमत न्यूज नेटवर्कवाई : नगराध्यक्षा डॉ. प्रतीभा शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले असून, बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटले. तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी काळ्या फिती लावून सभेतील सर्व विषय बहुमताच्या जोरावर नामंजूर केले. तसेच नगराध्यक्षांनी पोलिस बंदोबस्तात सभेचे कामकाज करण्याचा केलेला प्रयत्नही विरोधकांनी हाणून पाडला. सर्वसाधारण सभा केवळ वीसच मिनिटांत गुंडाळण्यात आली.दरम्यान, जोपर्यंत डॉ. प्रतिभा शिंदे नगराध्यक्षा पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत पालिकेतील कामकाजातील कोणत्याही विषयासंदर्भात सहकार्य करणार नसल्याचे तीर्थक्षेत्र आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सर्वसाधारण सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.वाई पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पोलिस बंदोबस्तात व व्हिडिओ चित्रीकारणासह सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे होत्या. उपनगराध्यक्ष अनिल सावंत व पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत विषय पत्रिकेवरील पाच विषयांसह सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीलाच उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगराध्यक्षा राजीनामा देत नसल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करीत सर्व विषय नामंजूर करीत सभा आटोपण्यास भाग पाडले. अध्यक्षांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी लावून धरल्याने सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने सभेत एकच गोंधळ उडाला व अवघ्या वीस मिनिटांत सभा संपल्याचे नगराध्यक्षांना जाहीर करावे लागले. पोलिस बंदोबस्तात कामकाजनगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी बुधवारी पालिकेत आयोजित सर्वसाधारण सभेचे कामकाज पोलिस बंदोबस्तात सुरू केले. मात्र, राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधकांनी त्यांचा हा प्रयत्नही हाणून पाडला. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे नगराध्यक्षा शिंदे यांना सभा लगेचच आटोपती घ्यावी लागली....अन्यथा कामकाजात सहकार्य करणार नाहीसभेनंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. राजीनाम्याची बाब न्यायप्रविष्ट असली तरीही पालिकेचा कारभार रामभरोसे असल्याची टीका विरोधकांनी केली. भाजपच्या स्वच्छ कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या डॉ. शिंदे यांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पालिकेच्या कामकाजात सहकार्य करणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. महाआघाडीसह विरोधी सर्व नगरसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
अग्गोबाई.. अरेच्च्या.. काळ्या फिती मिरविल्या !
By admin | Published: July 05, 2017 11:26 PM