वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरिला जोडणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत सातत्याने आवाज उठवूनही प्रशासनास जाग येत नसल्याने वडूज येथील संतप्त नागरिकांनी वडूज-दहिवडी रस्त्यावरील खड्ड्यात उभे राहून सुमारे तासभर आंदोलन केले.शहाजीराजे मित्र मंडळाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक शहाजी गोडसे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, माजी नगराध्यक्ष महेश गुरव, निलेशकाका गोडसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, मधुकर मोहिते, विक्रम गोडसे, आबासाहेब भोसले, राम लोहार यांच्यासह नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.विजय शिंदे म्हणाले, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करताना वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवून सुध्दा कुंभकर्णी बांधकाम विभाग व नगरपंचायत प्रशासनाला जाग येत नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
येत्या दोन दिवसात वडूज शहर परिसरातील खड्डे भरुन न घेतल्यास ऐन दिपावलीच्या सणात तीव्र आंदोलन छेडले जाईल. खड्डे भरल्याशिवाय अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही. असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आंदोलन स्थळी हजर राहून नगरपंचायत हद्दीतील सर्व खड्डे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याचे आश्वासन दिले.फलक ठरला लक्षवेधीआंदोलनावेळी ह्यवडूज शहर व परिसरातील भलेमोठे खड्डे तातडीने मुजविले नाही तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो या खड्ड्यात झळकणार आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुजविल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून दिले जाणार नाहीह्ण अशा आशयाचा फलक या खड्ड्यात मध्यभागी लावण्यात आला होता. या अनोख्या फलकांने नागरिकांसह वाहनधारकांचे लक्ष वेधले.