सातारा : कोरोना व सततच्या टाळेबंदीमुळे सातारा शहरातील फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेने या फेरीवाल्यांना जाहीर केलेले अनुदान तत्काळ प्रदान करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे.
कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, हातावर पोट असलेल्या अनेकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांची रोजीरोटी बंद झाली असून, उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. साताऱ्यातील फेरीवाल्यांनादेखील कोरोना व टाळेबंदीची मोठी झळ बसली आहे. आपत्कालीन परिस्थितीत संक्रमण साथ उद्भवल्यास नगरपालिका अधिनियमाप्रमाणे फेरीवाल्यांना रोजगारासाठी अनुदान देणे बंधनकारक आहे.
सहा महिन्यांपूर्वी सत्ताधारी सातारा विकास आघाडीने फेरीवाल्यांना पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप शहरातील नोंदणीकृत ५८६ फेरीवाल्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही. या फेरीवाल्यांचे आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांना तत्काळ अनुदान द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला. याशिवाय फेरीवाल्यांप्रमाणे रिक्षावाले, हमाल, धुणी-भांडी करणाऱ्या गरजू महिला यांनाही याप्रकाराचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.