लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुका कायम दुष्काळी. उन्हाळा जवळ आला की, पाण्याची टंचाई असायची. मात्र, धोम बलकवडी आणि नीरा देवघरच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याने दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून, शेती उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत.
खंडाळा तालुका हा दुष्काळी. शेती सिंचनाचा प्रश्न सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीही इथं उन्हाळ्यात वानवा व्हायची. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते, पण डोंगर पोखरून धोम बलकवडी आणि निरा देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तालुक्यात पोहोचले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांची होणारी फरफट थांबली आहे. धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत खंडाळा, बावडा, पारगाव, म्हावशी, अहिरे, खेड बुद्रुक, बोरी, पाडळी, निंबोडी, सुखेड यांसह १८ गावे लाभक्षेत्रात आली आहेत, तर नीरा देवघरच्या लाभक्षेत्रात शेखमिरेवाडी, मोर्वे, भादे, अंदोरी, शेडगेवाडी, कराडवाडी, वाघोशी, भोळी यांसह २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या दोन्ही कालव्यांना पाणीवाटप करारानुसार आवर्तने सोडली जातात. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होत आहे. पारंपरिक सिंचन स्रोतामध्ये पाणी क्षमता वाढली आहे. त्याचा फायदा शेतीपिकांच्या सिंचनासाठी होत आहे, तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच, सर्वत्र पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते, पण ही परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. या वर्षी टँकर सुरू करण्याची वेळ कोणत्याही गावावर अद्याप तरी आली नाही, पण त्यासाठी दोन्ही कालव्यांना उन्हाळ्याच्या मे महिन्यात किमान एक वेळा पाणी सोडणे आवश्यक आहे.
खंडाळा तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी पिके पूर्वी घेतली जात नव्हती, परंतु आता पाणी शिवारात खळाळू लागल्याने बहुतांशी जमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे ऊस, कांदा यासारख्या नगदी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे दोन्ही कालवे शेतीसाठी वरदान ठरलेले आहेत.
चौकट :
सिंचना योजना...
शेती पाण्याचा उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी उपसा सिंचन योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. तालुक्यात गावडेवाडी, शेखमीरेवाडी आणि वाघोशी या तीन ठिकाणी निरा देवघर प्रकल्पावर उपसा सिंचन योजना मंजूर आहेत, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. या प्रलंबित कामाच्या आरंभाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
चौकट :
कामांचा आढावा...
धोम बलकवडी व नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची उर्वरित कामे व पोट पाटांची कामे पूर्ण व्हावीत, तसेच उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करावीत, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतला होता. उर्वरित कामे सुरू करण्यासाठी करावयाच्या तरतुदी याची माहिती घेऊन मंत्रालयस्तरावर प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
फोटो ओळ : खंडाळा तालुक्यात नीरा देवघरच्या पाण्यामुळे कालवे भरून वाहत आहेत.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\