कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथे महिलांची शेती कार्यशाळा, परसबागेचे महत्त्व व मोफत बियाणे वाटप असा कार्यक्रम पार पडला. यावेळी सैदापूर मंडल कृषी अधिकारी विनायक कदम, कृषी पर्यवेक्षक विनोद कदम, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक नीलेश पवार उपस्थित होते. यावेळी विनायक कदम यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत याबद्दल माहिती दिली. सरपंच विक्रम कणसे, उपसरपंच संगीता माळी, विभाग समन्वयक चिन्मय वराडकर, सुशांत तोडकर, सुनंदा कणसे, सोनाली साळुंखे उपस्थित होत्या.
रस्त्यातील खड्ड्यांमुळे चालकांना त्रास
मसूर : मसूर ते शामगाव जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. मसूर ते शामगाव हा रस्ता पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. गुहाघर-विजापूर मार्ग म्हणून या रस्त्याला ओळखले जाते. मसूरपासून काही अंतरापर्यंत रस्त्याची स्थिती चांगली आहे. मात्र, काही अंतरापासून रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर बसफेरींची कमतरता
कुसूर : कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत एसटी बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. दिवसभरात या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. बसफेऱ्यांच्या कमतरतेमुळे खासगी वडापधारकांची संख्या वाढली असून, त्यांच्याकडून जलदसेवा दिली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळास तोटा सहन करावा लागत आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी बसगाड्याची संख्या कमी असते. अनेकवेळा प्रवाशांची गैरसोय होते.