ब्रिटिश राजवटीत सुमारे १९२० साली पुणे ते मिरज रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गावर शेणोली येथे उंच सखल भूभाग असल्याने तेथे मार्गालगतच्या शेतीतील माती उचलून त्याचा मार्गाला भराव करण्यात आला. त्यावेळी नैसर्गिक ओढ्यांचा निचरा होणारी ठिकाणे शाबूत ठेवण्यात आली होती. पुढे १९७० च्या दशकात पुन्हा झालेल्या नूतनीकरणावेळी फारसा बदल न करता काम झाले. त्यामुळे रेल्वे रूळ परिसरातील शेतांमध्ये पाणी साचून राहत नव्हते. मात्र, गत दोन ते तीन वर्षांत सुरू असलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामावेळी पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा पूर्णपणे भराव टाकून मोजण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे रुळालगतची शेणोली हद्दीतील सुमारे तीस एकर शेती बाधित होण्याच्या मार्गावर आहे. या मार्गावरील भराव वाढल्याने पावसाळ्यात शेतीत पाणी साचत आहे. परिणामी पिके कुजत आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाणी साचून राहत असल्याने पीक घेणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. यामुळे क्षेत्र पडून ठेवावे लागत आहे. रेल्वे खात्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- कोट
बाधित होणाऱ्या क्षेत्रानजीक रेल्वेने गटर बांधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढावा. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
- सुनील कणसे
शेतकरी, शेणोली
फोटो : १८केआरडी०१
कॅप्शन : शेणोली, ता. कऱ्हाड येथे रेल्वे रुळालगत शेतात पाणी साचून राहिल्याने नापिकीचा धोका आहे.