रामापूर : राज्यातील कृषी विभागामार्फत सर्वत्र दि. २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध आधुनिक तंत्रज्ञान व वेगवेगळ्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा स्थानिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे यांनी केले आहे.
पाटण तालुक्यातील मणदुरे येथे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच विलास कुराडे, मंडल कृषी अधिकारी संजय दीक्षित, कृषी सहाय्यक संतोष चव्हाण आदी मान्यवर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
ताकटे म्हणाले, ‘पाटण तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या भात रोपांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बियाण्यांपासून आठ ते दहा दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होणाऱ्या आधुनिक अशा श्री व दापोग पद्धतीचा अवलंब करावा. भाताची नियंत्रित लागवड करावी, युरिया ब्रिकेटचा वापर करावा. माती परीक्षणानुसारच खतांचा वापर करावा. बीजप्रक्रिया करून पाणी व कीडरोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळू शकते. शेतीसोबतच या विभागातील शेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग लागवड व नॅपेड, गांडूळखत युनिट अशा योजनांचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक प्रगती साधावी.’
कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. यावेळी परिसरातील प्रगतशील शेतकरी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
२३ रामापूर
पाटण तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, विलास कुराडे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला.