लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना लसीकरणाबाबतचे अनेक बुचकळ्यात टाकणारे प्रकार समोर येत आहेत. सातारा शहरातील एका व्यक्तीला लसीचा दुसरा डोस घेण्याआधीच त्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अहो आश्चर्यम्... लस न घेताच आले प्रमाणपत्र, असे म्हणत कपाळावर मारून घेण्याची वेळ या सातारकरावर आलेली आहे. प्रशासनाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये सेवक म्हणून काम करणारे दत्तात्रेय मिसाळ मामा यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. आता दुसरा डोस घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. योगान अनंत इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरणाचे शिबिर लागले. मिसाळ मामांना याचा आनंद झाला. लसीकरण शिबिर असल्याने सकाळी लवकरच त्यांनी शाळेमध्ये हजेरी लावली. शिबिरासाठी लागणारी सर्व तयारी मिसाळ मामांनीच केली. शिबिरासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हवे नको तेसुद्धा त्यांनी पाहिले.
दुसरा डोस घेण्यासाठी ते रांगेत थांबले. तर जेव्हा नंबर आला तेव्हा त्यांना संतापाला सामोरे जावे लागले. लसीकरण कर्मचाऱ्यांनी संगणकावर त्यांचे नाव आणि आधारकार्ड याचा उल्लेख करून तपासणी केली असता मिसाळ मामांनी यापूर्वीच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला असल्याचे दाखवत होते. लस न घेताच नोंद कशी दाखवते हा प्रश्न या कर्मचाऱ्यांनादेखील पडला. मात्र लसीकरणासाठी नोंद घेतली जात नसल्याने त्यांनीदेखील हात टेकले. मिसाळ मामांना निराश व्हावे लागले.
लसीकरणाचा सावळागोंधळ कशा पद्धतीने सुरू आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. एका बाजूला पहाटे लवकर लसीकरण केंद्रावर लोक येतात.. रांगा लावतात. मात्र, लस संपल्याचा फलक लागतो आणि निराश होऊन लोक घरी परततात. सामान्यांची कोणी दखलच घेत नाही, असे चित्र आहे. वशिलेबाजी करून काही लोक लस मिळवतात. मात्र सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागतात. आता लस न घेताच सर्वसामान्य लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू लागले तर काय करायचे? एका बाजूला लस न घेता प्रमाणपत्र दिले गेले आहे. संगणकावर त्याची अशी नोंद केलेली आहे, त्यामुळे दुसरा डोस मिळत नाही. डोस मिळाला नाही तर काय करायचे? लस न घेतल्याने कोरोना झाला तर? मिसाळ मामांच्या जागी तिसऱ्याच व्यक्तीने डोस घेतला आहे का? मिसाळ मामांना आता केव्हा डोस मिळणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आलेले आहेत. प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करेल का? हे पाहण्याजोगे ठरणार आहे. प्रशासनाने जर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले तर लसीकरणाचा सोहळा म्हणजे केवळ सोंग ठरेल.
कोट..
अनंत इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरणाो शिबिर ११ जुलै रोजी आयोजित केले होते. मी या शाळेतच सेवा बजावत असल्याने सकाळी सातपासूनच रांगेत नंबर लावून थांबलो होतो. लस घेण्याची वेळ आली तेव्हा संगणकावर मी पूर्वीच दुसरा डोस घेतला असल्याचे दाखवत होते. जिल्हा रुग्णालयातून लस घेतल्याबाबतचा फोन आला. पण डोस मिळालाच नाही असे मी त्यांना सांगितले आहे.
जादूने नोंद झाली... आता लस मिळणार कशी?
काही दिवसांपूर्वी दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांनादेखील पुन्हा डोस घेण्याबाबतच्या सूचना प्रशासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. ‘लोकमत’ने याबाबत पहिला घेतला.. दुसरा घेतला.. आता तिसरा डोस कसला! असे वृत्तदेखील प्रसिद्ध केले होते; प्रशासनाचा सावळागोंधळ आणखी एकदा समोर आला आहे. मिसाळ मामांना डोस न घेताच प्रमाणपत्र पाठविण्यात आले... आता दुसरा डोस मिळणार कसा? आणि अशा प्रकारे जादूने नोंद करणाऱ्या जादूगारांचादेखील शोध प्रशासन लावेल काय? हे प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत.
सर्टिफिकेट आणि मिसाळ यांचा फोटो आहे.