सातारा : डोक्यावर उसाची मोळी घेऊन ट्रॅक्टरमध्ये चढत असताना शिडीवरून पाय घसरला. यामुळे उसाठी मोळी अंगावर पडून अहमदनगरमधील ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाला. वनिता दिलीप राठोड (वय ३०, सध्या रा. वनगळ, ता. सातारा. मूळ रा. कोकिस्पिरतांडा, तो. मानिकदवंडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना वनगळ, ता. सातारा गावच्या परिसरात बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वनगळ (ता. सातारा) येथे ऊसतोडणी सुरू होती. वनिता राठोड या डोक्यावर उसाची मोळी घेऊन ट्रॅक्टरमध्ये ठेवत होत्या. त्यावेळी शिडीवरून त्यांचा पाय अचानक घसरला. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्यांच्या अंगावर उसाची मोळी पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. बुधवारी रात्री आठ वाजता उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिलीप बबन राठोड (वय ३२, रा. पाथर्डी, अहमदनगर) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली असून, हवालदार अशिष कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.
उसाची मोळी अंगावर पडून अहमदनगरच्या महिलेचा मृत्यू, साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: February 29, 2024 3:49 PM