रहिमतपूर : रहिमतपूर शहरातील पर्यावरणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी रहिमतपूर नगर परिषदेमार्फत यंत्राद्वारे हवेची गुणवत्ता तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी यंत्र ठेवण्यात आली आहेत.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबिवण्यात येत आहे. या अभियानाची नगर परिषदेमार्फत रहिमतपूर शहारात स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित विविध कामे करण्यात येत आहेत.
रहिमतपुरातील पर्यावरणाचा दर्जा उत्तम राखण्याकरिता व हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी हवेची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. यानिमित्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगरसेवक विद्याधर बाजारे, रमेश माने आदींच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
शहरातील व्यापारी क्षेत्र, रहिवासी क्षेत्र तसेच घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या ठिकाणची हवा गुणवत्ता तपासणी करण्यासाठी यंत्र बसविण्यात आले आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मैला व सांडपाणी व्यवस्थापन, वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना, जलस्रोत संवर्धन, वनीकरण, हरितीकरण, धुपीकरण, पारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदूषणाबाबत माहिती मिळणार आहे. वायू गुणवत्ता तपासणीमुळे शहरातील प्रदूषणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी दिली. यावेळी पालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
११रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील नगर परिषदेसमोर नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या उपस्थितीत हवेच्या गुणवत्तेची तपासणी करण्यास प्रारंभ करण्यात आला. (छाया : जयदीप जाधव)