सातारा : यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमावरून तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांच्यावर जावली तालुक्यातील मरडमुरे ग्रामस्थांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने मंगळवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. गावकीच्या माध्यमातून बहिष्कार टाकणे, दंड करणे असे प्रकार यापुढे होणार नाहीत, अशी लेखी ग्वाही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील वादावादीतून ही घटना घडल्याचे समोर आले होते. तानाजी आणि रंजना आढाव यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार केली होती. गावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला बोलावले जात नाही, असे त्यांनी म्हटले होते. शुक्रवारच्या (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जावळीचे तहसीलदार रणजित देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी ग्रामस्थांची बैठक बोलाविली. बैठकीला प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच ‘अंनिस’च्या डॉ. शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे उपस्थित होते. बहिष्कृत दाम्पत्य आणि ग्रामस्थांना तहसीलदारांनी म्हणणे मांडण्यास सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमावरून गावातील काही तरुण आणि आढाव यांचा मुलगा सुनील यांच्यात वादाचा प्रसंग उद््भवला आणि त्यातून हा प्रकार घडला, असे समोर आले. अशा कारणावरून दंड आकारण्याचा अथवा कोणाला बहिष्कृत करण्याचा प्रकार घटनाबाह्य असून, संबंधितांना क़डक शासन होऊ शकते, याची समज तहसीलदार देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. काही वेळा वादाचे प्रसंगही उद््भवले; मात्र अंतिमत: सामोपचाराने घेत ग्रामस्थांनी असे प्रकार भविष्यात घडू न देण्याची ग्वाही दिली. गावकीच्या माध्यमातून गावातले वाद गावात मिटविण्याची पद्धत योग्य असली, तरी पुढे घडणारे प्रकार कायद्याला मान्य नसल्याने यापुढे गावकीद्वारे निर्णय न घेता तंटामुक्ती समिती आणि पोलिसांचीच मदत याकामी घेतली जाईल, हेही ग्रामस्थांनी मान्य केले. (प्रतिनिधी)साखर वाटून आनंद व्यक्तबैठकीत सामोपचाराने निर्णय झाल्यानंतर बहिष्कृत आढाव दाम्पत्याला सरपंच शालन भिकू मर्ढेकर यांनी साखर दिली. नंतर आढाव दाम्पत्याने गावकऱ्यांना साखर वाटून आनंद व्यक्त केला. ाावात या वर्षभरात झालेल्या तीन विवाहांच्या पत्रिका आढाव दाम्पत्याला देण्यात आल्या नव्हत्या. तथापि, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर दुसऱ्याच दिवशी एक लग्नपत्रिका या दाम्पत्याला देण्यात आली. असेच गोड वातावरण कायम राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. (संबंधित वृत्त पान २ वर)
आढाव दाम्पत्यावरील बहिष्कार मागे
By admin | Published: February 24, 2015 11:32 PM