सातारा : ज्या राजसदरेवरून अटकेपार झेंडा रोवण्याचे फर्मान सोडण्यात आले, त्याच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सातारा पालिकेची विशेष सभा दिमाखात पार पडली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याच्या संवर्धनाचा विकास आराखडा तयार करून तो नगरविकास विभागाकडे पाठविण्याचा ठराव यावेळी एकमुखाने मंजूर करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा शहराची स्थापना केली. दि. १२ जानेवारी रोजी त्यांचा किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेची प्रथमच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा पार पडली. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवकांनी अभिवादन केले. यानंतर सभेला सुरुवात झाली.
सभा अधीक्षक हिमाली कुलकर्णी यांनी किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय सभेपुढे मांडला. यावर स्वीकृत नगरसेवक अॅड. दत्तात्रय बनकर म्हणाले, सातारा पालिकेने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार केला. तसाच आराखडा किल्ले अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनासाठी देखील तयार केला जाईल. या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच येथील तळी, मंदिरे, यांचे देखील संवर्धन केले जाईल. हा किल्ला पूर्वी पालिका हद्दीत नसल्याने विकासासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र हद्दवाढीने ही अडचण आता दूर झाली आहे. किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सादर केला जाईल. अर्थसंकल्पातही किल्ल्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल.
नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी किल्ल्याचे संवर्धन करीत असतानाच येथील स्ट्रीट लाईटचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा अशी मागणी केली. तर विकास कामे करावयाची झाल्यास सर्वप्रथम रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. त्यामुळे किल्ल्याकडे येणाऱ्या उर्वरित रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे अशी अपेक्षा स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी व्यक्त केली.
नगरसेवक निशांत पाटील म्हणाले, साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्याचा विकास व्हावा ही सर्वांचीच भावना आहे. अंतर्गत मतभेद विसरून आपण सर्व नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करू. ते नक्कीच किल्ल्यासाठी भरघोस निधीची तरतूद करतील. चर्चेनंतर किल्ल्याच्या विकास आराखड्याचाा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती सिद्धी पवार, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(चौकट)
पालिकेसाठी अभिमानाची बाब : माधवी कदम
अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर झालेली ही सभा खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिली.
(चौकट)
पालिकेच्या इतिहासात
प्रथमच किल्ल्यावर सभा
सातारा पालिकेची स्थापना १ ऑगस्ट १८५३ रोजी झाली. स्थापनेला आज तब्बल १६८ वर्ष पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीत पालिकेची कोणतीही सभा किल्ल्यावर झाली नव्हती. त्यामुळे किमान एक तरी सभा किल्ल्यावर व्हावी अशी अपेक्षा शिवराज्याभिषेक समिती व शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात होती. त्यानुसार मंगळवारी प्रथमच पालिकेची सभा किल्ल्याच्या राजसदरेवर पार पडली. किल्ल्यावर अशाप्रकारे सभा घेणारी सातारा ही राज्यातील बहुदा पहिलीच पालिका असावी.
(कोट)
अजिंक्यतारा किल्ल्यासाठी पालिका प्रशासनाने साठ लाखांची तरतूद केली आहे. किल्ल्याचा विकास आराखडा नगरविकास विभागाकडे पाठविला जाईल. साताऱ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणाऱ्या या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देऊ.
- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
फोटो : १२ पालिका सभा ०१
सातारा पालिकेची विशेष सभा मंगळवारी सकाळी अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर पार पडली. यावेळी छत्रपती शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अभिवादन केले.