सातारा : ‘अजिंक्यतारा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीच्या कायद्यानुसार उसाला दर दिला आहे. तरी सुध्दा एफआरपी. अदा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी कारखान्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून लवकरच डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅन्टचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अजिंक्यतारा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर रविवारी झाली. या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी ज्या सभासदांनी कारखान्याकडे नोंदणी केली होती, अशा सभासदांना सभेची लिंक पाठविण्यात आलेली होती. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. चेअरमन सर्जेराव सावंत अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक देसाई यांनी सभेची नोटीस व अहवाल वाचन केले. सर्व विषयास ऑनलाईन उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, आत्तापर्यंत या हंगामात ६,१७,१५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्यामध्ये ३,०१,८१० क्विंटल रॉ शुगर उत्पादन घेऊन रॉ शुगर थर्ड पार्टीमार्फत निर्यात करण्यात येत आहे. चालू गाळप हंगामामध्ये आत्तापर्यंत ५,२८,८३० मे.टन उसाचे गाळप झाले असून या उसाची प्रति मे.टन रूपये २६०० रुपये प्रमाणे पहिल्या ॲडव्हान्स हप्त्याची होणारी रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. या हंगामाकरिता कार्यक्षेत्रामध्ये गाळपासाठी उपलब्ध असलेले क्षेत्र विचारात घेता ७.०० लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.
न्यू दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन या शिखर संस्थेकडून कारखान्यास पुरस्कार मिळाल्यामुळे शेंद्रे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांचे कौतुक केले. कारखान्याचे संचालक नामदेव सावंत यांनी ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानले. सभेला सर्व संचालक आणि सभासद ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
कोट
मागील हंगामात कारखान्याचा साखर उतारा हा अत्त्युत्तम राहिल्यामुळे चालू सन २०२०-२०२१ चे गाळप हंगामाकरिता आपले कारखान्याची एफआरपी प्रति मे.टन रूपये ३०४३ रुपये इतकी निघालेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दर दहा दिवसांचे ऊस पेमेंट करणारा आपला कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना आहे.
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
फोटो ओळ : शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले.
फोटो ने म: १६बाबाराजे