सातारा : अजिंक्यतारा साखर कारखान्यासाठी अर्ज दाखल करण्यास काही दिवसच राहिले असून सत्ताधाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातूनच झालेल्या बैठकीत अनेक इच्छुक समोर आले. पण, आमदार शिवेंद्रसिंहराजे हे जुन्या-नव्यांचा मेळ घालून उमेदवारी देणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी कारखान्यासाठी एकच अर्ज दाखल झाला.सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे. दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचे या कारखान्यावर पूर्वीपासून वर्चस्व राहिले, तर आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कारभार पाहत आहेत. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा तालुक्यापुरते मर्यादित आहे. कारखान्याची सभासद संख्या २२ हजार ५०० आहे. कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध केल्या होत्या. आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पावले पडत आहेत. तसेच या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील, त्याला विद्यमान संचालकांचाही पाठिंबा असणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कारखाना परिसरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विद्यमान संचालक तसेच समर्थक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी उमेदवारी देण्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली. काहींनी दुसऱ्यांची नावे सुचविली. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मार्गदर्शन केले.
इच्छुक अनेक असले तरी, सर्वांनाच संधी मिळेल असे नाही. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. यासाठी नव्या-जुन्यांचा मेळ घालू. काही इच्छुकांना इतर संस्था, निवडणुकीत संधी देऊ, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बैठकीमुळे सत्ताधाऱ्यांकडून सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात.
सोमवार, मंगळवारीच अर्ज दाखल होणार...
१५ जूनपासूनच नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या दोन दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही. मात्र, शुक्रवारी तिसऱ्या दिवशी एका इच्छुकाने उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत २५ अर्जांची विक्री झालेली आहे. यामधील १० अर्ज हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आले आहेत, तर २१ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे शनिवार, रविवार सुट्टी असल्याने दोन दिवसच अर्ज दाखलसाठी हातात राहणार आहेत.