प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी राहिलेला अजिंक्यतारा किल्ला भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने तितकासा महत्त्वाचा नसावा, त्यामुळेच तो आजअखेर असंरक्षित राहिला. शासनाच्या नव्या धोरणानुसार छत्रपती शिवरायांचा हा किल्ला पुढील किमान ३० किंवा ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास पात्र ठरला आहे. गड-किल्ल्यांवरून राज्यभरात उठलेलं वावटळ खाली बसलं असलं तरी मराठा साम्राज्याची चौथी राजधानी अजूनही दुर्लक्षाच्या गर्तेत आहे.खासगी विकासकाच्या नरड्यात किल्ला घालण्याऐवजी शासनाने खास बाब म्हणून स्वनिधीतून किल्ल्याची दुरुस्ती, सुधारणा व सुविधा यांचा विकास करावा, अशी शिवप्रेमी शाहूनगरवासीयांची अपेक्षा आहे. राज्यातील २५ गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आला. प्रसार माध्यमातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने वर्ग दोनचेच किल्ले भाडेतत्त्वावर दिले जातील, असे स्पष्टीकरण दिले आहे. वर्ग १ मधील म्हणजे राज्य किंवा केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे संरक्षित केलेल्या किल्ल्यांचा विकास शासन स्वतंत्रपणे करते. रायगडाप्रमाणे या वर्गवारीतील किल्ल्यांचे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केले जाते. राज्यातील उर्वरित ३०० किल्ले हे असंरक्षित म्हणजे वर्ग २ मधील आहेत. त्यांचाच पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी दिले आहे.अजिंक्यतारा इतिहासात अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण राहिला आहे. पहिल्या आदिलशाहाची पत्नी चांदबिबी, बजाजी निंबाळकर याच किल्ल्यावर कैदेत होते. आजारपणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे दोन महिने वास्तव्य या किल्ल्यावर होते. शिवाजी महाराजांच्या पश्चात मुघल साम्राज्याचा सम्राट औरंगजेब हा किल्ला ताब्यात मिळवण्यासाठी आपल्या दोन मुलांसह किल्ल्याला वेढा टाकून बसला होता. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताºयात रोखले होते.रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी व त्यानंतर अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला. छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराजांचे राज्यारोहण याच किल्ल्यावर झालं. राजमाता येसूबाई, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांचे वास्तव्य याच किल्ल्यावरील वाड्यात राहिले. स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनेही हा किल्ला महत्त्वपूर्ण आहे.संरक्षित स्मारकाचे कवच मिळणार कधी ?‘छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदवी साम्राज्याचा मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या किल्ल्यांना नखही लावू देणार नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा इरादा स्पष्ट केला आहे. पुरातत्त्व विभागाने अद्याप अजिंक्यतारा किल्ल्याला ‘संरक्षित स्मारक’ म्हणून सुरक्षा कवच दिलेले नाही. त्यामुळे हा किल्ला वर्ग २ मध्येच राहिला आहे. परिणामी अजिंक्यतारा किल्ला भाडेतत्त्वावर देण्यासाठी विकासकांना पायघड्या घातल्या जाणार आहेत. शाहूनगरवासीय याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
इतिहासाचा साक्षीदार अजिंक्यतारा असंरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:48 AM