अजितदादा अजूनही शांत नाहीत, भाजपा नेत्याचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 03:47 PM2019-12-24T15:47:12+5:302019-12-24T15:48:25+5:30
'अजित पवारांना आम्ही कुठलाही शब्द दिलेला नव्हता'
क-हाड : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपाकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परत जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत, असे सूचक वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.
क-हाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना भंडारी बोलत होते. यावेळी क-हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर यांची उपस्थिती होती.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना माधव भंडारी म्हणाले, 'अजित पवारांना आम्ही कुठलाही शब्द दिलेला नव्हता. तेच आमच्याकडे आले होते. अजितदादांना आम्ही जेवढे ओळखतो त्यावरून ते बोलतात एक अन् करतात दुसरे, असा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले. त्याबाबत तुम्हाला तेच चांगले उत्तर देऊ शकतात, असेही माधव भंडारी यांनी सांगितले.