सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुठेही गेले नाहीत, ते राष्ट्रवादी पक्षासोबतच आहेत. त्यांनी अर्ज भरला नाही म्हणजे ते पक्षासोबत नाहीत, असा अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. तर, शिवेंद्रसिंहराजेच काय, मी पण उमेदवारी साठी अर्ज केलेला नाही. ही आमची चूक झाली ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, असेही अजित पवार म्हणाले.
साताऱ्यात असतानाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या भेटीला आलेले नाहीत, त्यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीही मागितली नाही. पक्षाने आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी ते उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे ते नाराज आहेत असे चित्र दिसत आहे, याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, माझं सकाळीच शिवेंद्रसिंहराजेंशी बोलणं झालं ते पक्षावर नाराज नाहीत. उगाच पराचा कावळा करू नका. कामाच्या व्यस्ततेमुळे ते मुलाखतीसाठी येऊ शकले नाहीत. मागील काही काळामध्ये मलासुद्धा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे अर्ज सादर करता आला नव्हता. राजेश टोपे, राणा पाटील यांच्या बाबतीतही अशा घटना घडलेल्या होत्या. मी सकाळी शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी बोललो. ते जिममध्ये होते, मी नंतर फोन करतो असे ते म्हणाले. सातारा जावळीतून शिवेंद्रसिंहराजे यांच्या व्यतिरिक्त पक्षातून दुसरे कुठलेही नाव पुढे आलेले नाही.
पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यामध्ये नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला ही शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांच्यासोबतच जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते. उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मुंबईत बोलावण्यापेक्षा आपणच स्थानिक जिल्हयामध्ये जाऊन यांच्या मुलाखती घ्याव्यात, असा निर्णय झाला. त्यामुळे मी इथे आलो आहे. अजून मित्रपक्षांशी जागा वाटपाबाबत बोलणी झालेली नाहीत. सातारा मतदारसंघासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. जो मतदारसंघ मित्रपक्षांना दिला जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करायचं, असा शब्द इच्छुकांनी दिला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.