अजित पवारांचा बूस्टर डोस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोसणार का?, कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 02:09 PM2023-05-10T14:09:51+5:302023-05-10T14:10:15+5:30
कोरेगावात अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला
साहिल शहा
कोरेगाव : कोरेगावात सोमवारी झालेल्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. निवडणुकीच्या यश-अपयशाबद्दल बोलत असतानाच त्यांनी जनतेत जाऊन काम करण्याचा कानमंत्र दिला. मात्र, हा कानमंत्र किती जणांच्या पचनी पडला आणि भविष्यकाळात हा कानमंत्र वापरून राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था मिळवून देणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांमध्ये या विषयाची दबक्या आवाजात चर्चा होती.
विधानसभा निवडणुकीपासून कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने बॅक फूटवर जात होती. अनेक निवडणुकीत पराभवाला सामोरे जात असताना पक्ष संघटना काही केल्या बळकट होत नव्हती. बाजार समिती निवडणुकीत मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली. केवळ मूठ बांधून ते थांबले नाहीत तर निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन विजय संपादन केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काहीअंशी अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. मात्र सांघिक यश मिळवत बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.
या विजयाप्रीत्यर्थ अजितदादा पवार यांनी कोरेगावात येऊन जाहीर सभा घेतली. स्पष्ट वक्ते आणि कुशल प्रशासक या दोन्ही भूमिका त्यांच्या भाषणामधून दिसून आल्या. त्यांनी विजयी झालेल्या संचालकांना शुभेच्छा देत असताना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या. नेते मंडळींनाही कानपिचक्या देत या विजयाने हुरळून न जाण्याचा इशारा दिला.
अजित पवार यांचा कोरेगावशी तसा निकटचा संबंध आहे. सातत्याने ते कोरेगाव दौऱ्यावर येत असतात, त्यामुळे त्यांना तालुक्याची किंबहुना विधानसभा मतदारसंघाची खडान्खडा माहिती आहे. त्यांनी भाषणामध्ये स्वकियांबरोबरच विरोधकांचा सातबारादेखील काढला. अनेकांनी आपली राजकीय दृष्टी बदलावी यासाठी आपापले चष्मेदेखील पुसायला भाग पाडले, मात्र या नेते मंडळींची राजकीय दृष्टी भविष्यकाळात तरी सुधारेल का, हा मोठा प्रश्न आहे.
पवार कुटुंबातील व्यक्ती आली की पक्ष संघटना जिवंत होते आणि त्यांची वाट फिरल्यानंतर येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती या मतदारसंघात आजवर पहावयास मिळते. त्यामुळे अजितदादांचा दौरा हा राष्ट्रवादी काँग्रेसला फलदायी ठरणार का? हा आगामी काळच ठरवणार आहे.