अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
By दीपक देशमुख | Published: February 25, 2024 02:38 PM2024-02-25T14:38:58+5:302024-02-25T14:39:36+5:30
Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
- दीपक देशमुख
सातारा : राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
सातारा येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, अतुल भोसले, सुनील काटकर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, देशाची परिस्थिती नव्हे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर त्यांची अशी बिकट परिस्थिती झाली नसती, असे सांगत त्यांनी पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
विरोधकांचा ईव्हीएम मशीनला आक्षेप असल्याबात फडणवीस म्हणाले, विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते व हरतात तेव्हा ईव्हीएम मशीन खराब असते. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. परंतु, कुणीही ते स्वीकारू करू शकले नाही. हरण्याची मानसिकता झाली की त्यांना ईव्हीएम मशीन आठवते.
भाजपने आपणास वापरून फेकून दिल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर फडणवीस म्हणाले, त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते आम्हाला शिव्या देतात. परंतु, आम्ही मोठा भाऊ असल्याने शांतपणे ऐकून घेतो.
पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचे रॅकेट संपवायचे असेल तर राजकीय हेवेदावे सोडून मदत करायची तयारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले फडणवीस म्हणाले, याबाबत पोलिसांनी कठोर भुमिका घेतली आहे. सुप्रिमा सुळे या मदत करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. बावनकुळे यांनी छोटे-छोटे पक्ष संपवा, असे कुठेही म्हटले नसल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
सातारा लोकसभेबाबत उत्सुकता तशीच
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा निर्णय व्हायचा आहे. याबाबत चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. अजून एकदोन फेऱ्या झाल्यानंतर याचा अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. जागा वाटपानंतर उमेदवारीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सातारा लोकसभेची उमेदवारी कोणाची, हे योग्य वेळी सांगण्यात येईल. माझ्यासारख्या नेत्यांनी याबाबतची अटकळ बांधणे चुकीचे होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीची उत्सुकता कायम ठेवली.