Satara Lok Sabha ( Marathi News ) :सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उदयनराज भोसले यांच्या प्रचारासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली आहे. "यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला वाई-महाबळेश्वर-खंडाळा या भागातून एक लाखांचं मताधिक्य द्या, जूनमध्ये मी नितीन पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांच्या औलाद सांगणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने पक्षाला भरभरून प्रेम दिलं आहे. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातून आपला निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी ही जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला दिली आहे. भाजपकडून या जागेवर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. याच उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार यांनी सभा घेतली.
प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा खासदार निवडून देत आहात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळं बटण दाबताना तुमच्या मनात वेगळी भावना येईल. पण तुम्ही काही चिंता करू नका. आता तुम्ही चांगलं मतदान करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. जूनमध्ये मी नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो. साताऱ्यात दोन खासदार झाल्यानंतर तुमची कामं व्हायला मदत होईल," अशी साद अजित पवारांनी सातारकरांना घातली.
साताऱ्यात आज दोन दिग्गज नेत्यांच्या सभा
सातारा लोकसभेसाठी आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तालीम संघ मैदानावर सभा होत आहे. महायुती उमेदवार व खासदार उदयनराजेंसाठी ही सभा असणार आहे. तर सायंकाळी ६ च्या सुमारास साताऱ्यातीलच जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. दोन्हीही सभा एकाचवेळी होणार असल्याने दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.