अजित पवारांवर भरवसा नाय म्हणत सोबत किती जाणार याचीच चर्चा
By दीपक शिंदे | Published: April 19, 2023 02:37 PM2023-04-19T14:37:34+5:302023-04-19T14:37:52+5:30
कार्यकर्त्यांच्या मनात अजित पवारांबाबत एक अनामिक भीती कायम
दीपक शिंदे
सातारा: राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे मंगळवार सकाळपासूनच अनेकांची धावपळ उडाली. कोण कुठे आहे आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे. आपले आमदार कुठे आहेत. आता काय करायचं, अशा एक ना अनेक शंकांनी सर्वांची मने कावरीबावरी झाली होती. प्रत्येकजण फोन करून आमदार साहेब कुठे आहेत, याची माहिती घेत होते. फोन लागत नाही म्हणून अस्वस्थ होत होते. स्वीय सहायकांचे फोन बंद येत होते आणि नेते नॉट रिचेबल होते. त्यामुळे काही का होईना पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती. अजित पवारांचं काही खरं नसतं. असे सांगत त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांचं मनच धजावत नव्हतं. जिल्ह्यातून सोबत गेले तर एक आमदार मकरंद पाटील आणि दुसरे रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेच जातील, इथपर्यंत येऊन चर्चा थांबत होती.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार आणि भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री होणार, याची चर्चा आज दिवसभर शहरातील गल्लीपासून गावातील पारापर्यंत रंगली होती. अजित पवार राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असे त्यांनी स्वत: सांगितले असले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांचे मन धजावेना. ते कधीही बेधडक निर्णय घेऊ शकतात, असे कार्यकर्तेच खासगीत बोलू लागलेत. फक्त त्यांच्यासोबत किती आमदार जाणार याचीच चर्चा आहे. काहींच्या अंदाजानुसार ३०, तर काहींचा अंदाज अगदी ४५ पर्यंत पोहचलाय.
रामराजेंचे स्टेटस
विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे बऱ्याचदा आपली भूमिका स्टेटसच्या माध्यमातून जाहीर करत असतात. आपल्याला जे काही सांगायचे आहे. ते स्टेटस ठेवले की कळते. कोणी फोन केला तरी स्टेटस पाहिले का, असा प्रश्न विचारला जातो. स्टेटस न दिसल्याने त्यांची भूमिका कार्यकर्त्यांना कळू शकली नाही. त्यामुळ कुछ तो बात है, असे अनेकांना वाटून गेले.
आमदार मकरंद पाटील नॉट रिचेबल
वाई - महाबळेश्वर - खंडाळा या विस्तीर्ण मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे झंझावाती नेतृत्व. जिल्ह्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांची दररोज मजल असते. त्यामुळे त्यांचा फोन कधी लागतो, तर कधी लागत नाही. त्यांचा फोन मंगळवारी लागत नसल्याने कार्यकर्ते दिवसभर अस्वस्थ होते. अनेकांनी एकमेकांना फोन करून आबा कुठे आहेत, याची विचारपूस करत आपल्या आमदारांचा ठावठिकाणा जाणून घेतला.
बाळासाहेब पाटील कार्यक्रम आणि इफ्तार पार्टीत
राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दुसरे प्रबळ नेते आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे मतदारसंघात विविध कार्यक्रम सुरू होते. ते कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे कार्यकर्त्यांना काहीच भीती राहिली नव्हती. आपले आमदार अजून मतदारसंघातच आहेत. त्यांना बहुतेक वरून फोन आलेला दिसत नाही, अशी माहिती देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना दिलासा दिला, तर बुधवारी इफ्तार पार्टी असल्याने त्या दिवसाचीही शंका कोणाच्या मनात राहिली नाही.
खासदार साहेबांच्या वाट्याला कोणी गेलेच नाही
खासदार श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्यास कोणालाच वाव नाही. जे काही पक्ष नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणेच त्यांची भूमिका असणार हे निश्चित. त्यामुळे ते कुठे आहेत आणि कोणासोबत आहेत, असे विचारण्याचे धाडसही कोणी करत नाही हे विशेष.
हाय तर हाय अन नाय तर नाय
अजित पवार यांचा बाणा रोखठोक आहे. एखादी गोष्टी होणार असेल तर होय आणि होणार नसेल तर नाही म्हणून लगेच कंडका पाडतात. हे झाले इतरांच्या कामाबाबत. पण स्वत:च्या बाबतीत ते कोणताही धक्कादायक निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या मनात अजित पवारांबाबत एक अनामिक भीती कायम आहे.