अजित पवारांमुळे भाजपला फरक नाही; भाजपचे मंत्री स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:11 AM2023-09-29T08:11:46+5:302023-09-29T08:12:06+5:30
अजयकुमार मिश्रा : लोकसभेच्या उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. १८ कोटी सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला काही फरक पडेल असे वाटत नाही. जो काही फायदा, तोटा होईल, ते भविष्यात समजलेच, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी अजय कुमार मिश्रा यांनी केले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मिश्रा पुढे म्हणाले, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, जी - २० परिषद आणि १३ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना वेगळी गती दिली आहे. जी -२० परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली संस्कृती आणि परंपरा यांची वेगळी ओळख जगाला घडवून दिली आहे. या परिषदेच्या भारतातील ६० शहरांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. विश्वशांतीच्या दृष्टीने आणि विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेच्या निमित्ताने निर्माण झाली.
मिश्रा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्व ४८ जागा खात्रीने निवडून आणणार आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा कोणता असणार याबाबत मिश्रा म्हणाले, अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे या संदर्भात चर्चा सुरू आहे. योग्य वेळी या दोन्ही आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.