"जुने मुद्दे काढणे ही फालतुगिरी"; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
By नितीन काळेल | Published: April 9, 2023 06:17 PM2023-04-09T18:17:02+5:302023-04-09T18:19:22+5:30
आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
सातारा : ‘सध्या जुने मुद्दे काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. यामुळे बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का? आता त्यांच्याकडे महत्त्वाचे मुद्देच राहिले नाहीत, ही तर फालतुगिरी आहे,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर ट्वीटच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर द्यायला बांधिल आहे का, त्याने अंगाला भोके पडतात का? असा प्रश्नही उपस्थित केला.
सातारा जिल्हा दाैऱ्यावर रविवारी अजित पवार होते. साताऱ्यातील जिल्हा बॅंकेतील कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. या कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘महत्त्वाच्या व्यक्तीने काय वक्तव्य केले तर त्याबद्दल मत व्यक्त करावे लागते. कारण, मत व्यक्त केले नाही तर लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण होतात. त्याबद्दल उत्तर द्यायला बांधिल आहे. पण, रोजच हाैसे, गवसे ट्वीट करणार. त्याच्या बातम्याही येणार म्हणून काय उत्तर द्यावे एवढेच काम नाही.
आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, टाटा, बिर्ला यांनी उद्योगाचा पाया रचला. लोकांना रोजगार दिला. त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाला. अंबानी आणि अदानींनीही तसेच केले. आता अदानींबाबत समिती नेमण्यात येणार आहे. समिती नेमल्यानंतर वस्तूस्थिती समोर येईल. पण, आपण लगेच कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो हेही बरोबर नाही. अदानींमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे पाठिशी आहेत. तोपर्यंत काही होणार नाही.
राज्यात वळीव पावसामुळे नुकसान झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्री अयोध्या दाैऱ्यावर असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी ‘मुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. आम्हीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना करू, शकतो. मुंबईला गेल्यावर मुख्य सचिवांशी याबाबत बोलणार आहे. पण, श्रध्दा असल्याने आम्हीही कोणत्याही देवस्थानला जातो. काही लोक शिर्डी, जेजुरी, तिरुपतीला जातात. ज्यांना योग्य वाटते ते तसे जातात, असे स्पष्टीकरण दिले.
जिल्हा बॅंकेचे काम चांगले...
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य असणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आहे. या बॅंकेचे नेतृत्व आतापर्यंत दिग्गजांनी केले आहे. आता नितीन पाटील यांच्या रुपाने नवीन पिढी चांगले काम करत आहे, असे ग़ाैरवोद्गारही अजित पवार यांनी काढले.