सोम्या-गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही, अजित पवारांनी उडवली राणेंची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:15 AM2022-06-13T11:15:16+5:302022-06-13T11:16:21+5:30
अजित पवार यांनी निलेश राणेंनी केलेल्या टिकेसंदर्भातील प्रश्नावरुन राणेंची खिल्लीच उडवली आहे.
सातारा - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बिनधास्तपणाच्या शैलीमुळे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या कामाची, भाषणाची आणि एखाद्याला खडसावण्याची स्टाईलही हटके आहे. त्यामुळे, त्यांच्या या स्टाईलचं अनेकदा सोशल मीडियातून कौतुकही होतं. तर, त्यांच्यावर टिका करणाऱ्यांनाही ते अधिक महत्त्व न देता कामाला प्राधान्य देत असल्याचं सातत्याने सांगतात. आता, अजित पवार यांनी निलेश राणेंनी केलेल्या टिकेसंदर्भातील प्रश्नावरुन राणेंची खिल्लीच उडवली आहे.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा अजित पवार गुल, अशा शब्दात निलेश राणेंनी अजित पवारांवर टिका केली. तसेच, बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत. कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असा खोचक टोमणाही राणे यांनी ट्विटवरुन लगावला होता. यासंदर्भात पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता, मी सोम्या-सोम्याच्या टिकेला महत्त्व देत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
शिवसेनेच्या पराभवानंतर संदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, असे म्हणत उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. तर, राणे बंधुकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला हलक्यात काढलं. सोम्या-गोम्याच्या ट्विटला मी महत्व देत नाही, असे म्हणत निलेश राणेंनी केलेल्या ट्विटवर अजित पवारांनी टीका केली.