अजित पवार सातारचे पालकमंत्री होणार?, 'काकां'ना शह देण्यासाठी 'पुतण्या' चाल खेळणार?

By प्रमोद सुकरे | Published: July 6, 2023 01:59 PM2023-07-06T13:59:44+5:302023-07-06T14:00:10+5:30

मनात आणलं अन करूनही दाखवलं

Ajit Pawar to be Guardian Minister of Satara? Will play tricks to encourage Sharad Pawar | अजित पवार सातारचे पालकमंत्री होणार?, 'काकां'ना शह देण्यासाठी 'पुतण्या' चाल खेळणार?

अजित पवार सातारचे पालकमंत्री होणार?, 'काकां'ना शह देण्यासाठी 'पुतण्या' चाल खेळणार?

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : महाराष्ट्राच्या राजकारणात गत ३ वर्षात रविवारी तिसऱ्यांदा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्री पदांच्या शपथाही घेतल्या. त्यानंतर 'थोरल्या' पवारांनी नाराजी व्यक्त करीत  दुसऱ्याच दिवशी कराड सह सातारा जिल्ह्याचा पहिला दौरा केला. तेव्हा त्यांनी नव्या लढाईचा एलगारही केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते थोरल्या पवारांबरोबर दिसले. पण 'काकां'ना शह देण्यासाठी 'पुतण्या' चाल खेळणार का? सातारचे पालकमंत्री अजित पवार होणार का? या बाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे पवारांची नेहमीच मर्जी राहिलेली आहे. विशेषता अजित पवारांनी काही काळ सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलेले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची त्यांची चांगलीच नाळ  जुळलेली आहे. तसेच या कार्यकर्त्यांची खडानखडा  माहिती ही त्यांनी ठेवली आहे.

पण दस्तुरखुद्द अजित पवारांच्याच बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभे दोन भाग पडले आहेत. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचीही मोठी कोंडी झाली आहे .आता 'थोरल्या' की 'धाकट्या' पवारांबरोबर जायचं? हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न पडला आहे. ही सत्वपरीक्षा नेमकी कोण कशी देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कराडला त्यांचे गुरु दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. आणि नव्या इनिंगला सुरुवात केली. या दौऱ्यात जिल्ह्यातील बरेच राष्ट्रवादीचे नेते थोरल्या पवारांबरोबर दिसले खरे पण, यातील कोणीही अजित पवारांच्या विरोधात भाष्य मात्र केलेले दिसत नाही. थोरल्या पवारांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांवर दबाव राहणे साहजिकच आहे. पण हाच दबाव कमी करण्यासाठी अजित पवार पुन्हा एकदा सातारचे पालकमंत्री होतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या सहभागामुळे राज्यात सध्या ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मंत्रीमंडळ विस्तार व पालकमंत्री निश्चित केले जातील यात शंका नाही. त्यावेळी नव्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येईल हे पहावे लागेल. पण त्यात अजित पवार सातारच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

अजित दादांना मानणारा स्वतंत्र गट

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होताच. पण त्यातही या जिल्ह्यात अजित दादांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे. अजितदादांची काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या हटके स्टाईलने कार्यकर्त्यांची कामे करून त्यांना नेहमीच बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे कार्यकर्ते काय करणार? हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच.

त्यांना कार्यकर्त्यांच्या नाड्या माहिती

अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अन नसतानाही सातारा जिल्ह्यात नेहमीच लक्ष ठेवल्याने अनेकांच्या नाड्या त्यांना पक्क्या माहित आहेत. त्यामुळे आज कोण कुठेजरी गेले तरी त्यावर उपाय काय करायचा ? कोणाच्या नाड्या कधी आवळायच्या हे त्यांना पक्के माहित आहे. त्यासाठी ते कदाचित सातारचे पालकमंत्री पद घेतील अशीही चर्चा राष्ट्रवादी कार्यकर्ते्यांच्यात आहे.

मनात आणलं अन करूनही दाखवलं !

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक मात्र काँग्रेसच्या विलासराव पाटील -उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली चालत होती. ही गोष्ट अजित पवार यांना नेहमी खटकत राहिली. थोरल्या पवारांनी यात कधी फारसे लक्ष दिले नाही. शेवटी अजित पवारांनी मनात आणलं आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पँनेल स्वतंत्रपणे उभे करत ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिपत्याखाली आणली.

Web Title: Ajit Pawar to be Guardian Minister of Satara? Will play tricks to encourage Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.