अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार
By दीपक शिंदे | Published: March 9, 2024 05:02 PM2024-03-09T17:02:01+5:302024-03-09T17:02:27+5:30
बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान
दीपक शिंदे
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट आग्रही होता. मात्र, भाजपने या मतदारसंघावर आपला दावा करत सातारा भाजपसाठी सोडण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या गटात त्यामुळे अस्वस्थता असली तरीदेखील त्यांना सोबतच काम करावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. त्याबाबत अजित पवार यांनीही आपण साताऱ्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले. मात्र, मागील दोन दिवसांत अनेक बैठका आणि चर्चा सुरू झाल्या असून अजित पवारांनी साताऱ्याचा नाद सोडून केवळ बारामती, रायगड आणि शिरूरवरच समाधान मानल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना मिळणाऱ्या कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अडचणीचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या गटात थोडी नाराजीच दिसून येत आहे. आमदार मकरंद पाटील यांनी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असा निकराचा इशारा दिला होता. मात्र, भाजपच्या राजकीय दबावापोटी फार काही हातात पडेल असे दिसत नसल्याने, मिळणाऱ्या जागांवरच समाधानी होऊन त्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते लागले कामाला
राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ सोडल्याचे कळताच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते पुन्हा जोशात कामाला लागले आहेत. मेळावे आणि मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंचा प्रचार सर्वदूर पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमांना होत असलेली गर्दी आणि साताऱ्याचा खासदार असावा, अशी असणारी अपेक्षा यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची सर्वांना आतुरता लागलेली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा खासदार उदयनराजेंसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनाच संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. भाजपच्या नेतृत्वाने देखील या मागणीचा गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे उदयनराजेंना नक्कीच संधी मिळणार असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला आहे. - सुनील काटकर, समन्वयक, सातारा लोकसभा मतदारसंघ
सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडला जावा, अशी आमची कायम मागणी होती. भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. त्याबरोबरच मित्रपक्षांच्या सोबतीने भाजपला हक्काचा खासदार मिळवून देण्याची संधी आहे. लवकरच याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार असून सर्वच जण आता या निर्णयाची वाट पाहत आहेत. - धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप