सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार आणि धोरण बदलले आहे. त्यामुळे १० वा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीत आली आहे. अजितदादांच्या जाण्याने महाविकास आघाडीची वज्रमूढ आता ढिली झाली आहे,’ असा हल्लाबोल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तसेच सध्याचे बहुमत पाहता अजित पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांची माहिती देण्यासाठी अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कारण, गेल्यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करताना धावपळ करावी लागली. यावर्षी वेळेपूर्वी १०० टक्के निधी खर्च कसा होईल यावर निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुलै महिन्याअखेरपर्यंत जास्तीतजास्त कामाची वर्क आॅर्डर काढण्यात येणार आहे. त्यामुळे १०० टक्के निधी वेळेत खर्च होईल. तसेच जलजीवन मिशनमधून घराेघरी स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे. या मिशनच्या कामांनीही वेग घेतला असून निधीही आणला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार हे महायुतीत आल्याने शिंदे गट नाराज झालेला नाही. आम्ही ५० जण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मान दिलेली आहे. पूर्वी युतीत ९ पक्ष होते. आता राष्ट्रवादी काॅंग्रेस हा दहावा पक्ष म्हणून सामील झालाय, असे सांगितले. तसेच शिंदे गट राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नेहमी टीका करायचा. आता अजित पवार युतीत आल्याने अडचण निर्माण झाली आहे का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी अजित पवार हे चालणारे नाणे आहे. त्यांनी विचार आणि धोरण बदललंय. अजित पवारांच्या येण्याने आमची ताकद वाढली आहे, असे स्पष्ट केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील १७ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री देसाई यांनी राऊत यांनी नावे सांगावीत असे आव्हान दिले. तसेच ते बोलतात आणि तोंडघशी पडतात असा टोलाही लगावला.
दर्जेदार रस्त्यांसाठी स्वतंत्र गुणनियंत्रण समिती...जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावर पत्रकार परिषदेत त्यांनी बांधकाम विभागाला रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची सूचना केल्याचे सांगितले. तसेच ही कामे दर्जेदार होण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र गुणनियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.