राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष
By दीपक देशमुख | Published: August 20, 2023 05:03 PM2023-08-20T17:03:22+5:302023-08-20T17:04:22+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने आता पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संपर्ण राज्यातील पक्षसंघटनेच्या जबाबदारीचे वाटप गटाच्या नऊ मंत्र्यांमध्ये केले आहे. यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे.
राज्यात शरद पवार व अजित पवार गट हे वेगवेगळे झाले असले तरी जिल्ह्यात दोन्ही बाजूंनी कोणतेही शरसंधान झालेले नाही. मात्र, अजित पवार गटाने आता राज्यात पक्षसंघटनेवाढीसाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मंत्रीनिहाय जिल्ह्याची जबाबदारीचे पत्र प्रसिध्दीला दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार गटाचे मंत्री हे प्रत्यक्ष जावून सभा, कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारांशी संवाद, शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार व पक्षसंघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या जबाबदारीच्या वाटपात अजित पवार यांच्याकडे सातारा जिल्हा आला आहे. त्यानी यापुर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्यात त्यांना मानणारे कार्यकर्ते असून त्यांचे नेटवर्क चांगले आहे. यामुळ लवकरच जिल्ह्यातील समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे