नागठाणे : सातारा तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार गाव म्हणजे नागठाणे. नागठाणे (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी अजिंक्य पॅनलने पुन्हा एकदा १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखत एकहाती सत्ता काबीज केली.
सुरुवातीपासून संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागलेल्या आणि अत्यंत चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पॅनलने १७ जागा जिंकून विरोधी चौंडेश्वरी पॅनलचा पूर्णतः धुव्वा उडवला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व झाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनमताचा कौल चौंडेश्वरी ग्रामविकास पॅनलच्या बाजूने लागला असताना त्यावेळी चौंडेश्वरी ग्रामविकास पॅनलचे १० तर अजिंक्य पॅनलचे ७ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे ही पंचवार्षिक निवडणूक गावातील दोन्ही पॅनलसाठी प्रतिष्ठेची झाली होती. नुकत्याच लागलेल्या निकालात अजिंक्य ग्रामविकास पॅनलने १७ जागांवर आपले उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणून सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून विरोधी चौंडेश्वरी ग्रामविकास पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये वॉर्ड क्र. १ मधून चंद्रकांत पवार, रेश्मा कदम, राजेश साळुंखे, वाॅर्ड २ मधून रूपाली बेंद्रे, दीपाली साळुंखे, किरण साळुंखे, वाॅर्ड ३ मधून अनिल साळुंखे, वंदना सुतार, वाॅर्ड ४ मधून मनीषा जाधव, उषा कांबळे, बापूराव मोहिते, वाॅर्ड ५ मधून उषा साळुंखे, सुलोचना साळुंखे, हणमंत साळुंखे, वाॅर्ड ६ मधून प्रशांत तिवाटने, स्वप्नाली नलवडे, दत्तात्रय पांडुरंग साळुंखे यांचा समावेश आहे.