सातारा तालुक्यातील एका गावात लसीकरणासाठी महिला, पुरुष सकाळपासूनच रांगेत उभे होते. ढग बाजूला झाल्यानं ऊन्ह लागत होतं. त्यातच रांग पुढे सरकेना, असे चित्र पाहून एक म्हातारी मोठ्यानं ओरडली, आरं आवरा की..जड हात झाल्यात काय तुमचं अन् वशिल्याच्या लोकांना आत पाठवताय होय..चांगलं चाललंया आम्ही काय ऊन्हात उभं राहून आडवं व्हायचं का? म्हातारीचा आवाज ऐकून केंद्रावरील आशा वर्कर, नर्स, मदतनीस अन् ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाहेर आले, ‘या म्हातारीला पहिलं आत घेऊन लस टोचा,’ असं एकानं सुचवलं. ग्रामपंचायतीचा शिपाई पळतच म्हातारीपाशी आला..आक्का चल आत लस घे अन् गप्प घरला जा..असं तो म्हणाला. मात्र, म्हातारी गप्प बसली नाही. लस टोचताय म्हणजे उपकार नाय करत...चल दे अन् जाऊ दे..म्हणत म्हातारीनं लस घेतली अन् बाहेर पडता पडता पुन्हा कालवा सुरू केला तेव्हा आक्का...तुझं झालंय नव्हं तर कालवा कशाला? म्हणत शिपायानं म्हातारीचे पाय धरले.
(सागर गुजर)