सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीतील कण्हेर धरणात मित्रांसमवेत पोहायला गेलेला स्वराज संभाजी माने-देशमुख (वय २३, रा. अकलूज, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) हा भावी डाॅक्टर बुडाला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली असून, रेस्क्यू टीमच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने एका मेडिकल काॅलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते. स्वराजला चांगले पोहता येत होते. त्याच्यासमवेत दोन मुले पोहत धरणात दूरवर गेली. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तिघेही मुले परत निघाली. मात्र, त्यावेळी स्वराजला दम लागला. तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांच्या निदर्शनास आला. परंतु त्यांनाही दम लागल्यामुळे ती दोन्ही मुले कशीबशी धरणाच्या काठावर पोहत आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. धरणात मधोमध अंतर खूप असल्यामुळे कोणालाही स्वराजजवळ पोहोचता आले नाही.
अखेर तो धरणात बुडाला. या प्रकाराची माहिती मुलांनी सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या पथकाला सोबत घेऊन तातडीने घटनास्थळ गाठले. रेस्क्यू टीमच्या जवानांनी सलग साडेपाच तास शोध मोहीम राबविली. मात्र, स्वराजचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे रात्री आठ वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या रेस्क्यू टीमध्ये चंद्रसेन पवार, देवा गुरव, सिद्धार्थ गायकवाड, अजिंक्य सातपुते आणि आदित्य पवार यांचा समावेश आहे.
स्वराज हा साताऱ्यातील -एका मेडिकल काॅलेजमध्ये ‘बीएचएमएस’च्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
त्याचा फोटो अखेरचा ठरला -स्वराज धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याच्या एका मित्राने त्याचा फोटो काढला. अगदी उत्साहात तो धरणात पोहण्यासाठी उतरला. काठावर बसलेल्या काही मित्रांनी ‘त्या’ तिघांना चिअरपही केलं. वेगाने तो पोहत धरणाच्या मधोमध गेला; पण परत आलाच नाही. मित्राने काढलेला त्याचा फोटो अखेरचाच ठरला.