सातारा : या..लवकर बसा..,असे अस्सल मराठी बोलतच प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमारने आपल्या भाषणास सुरुवात केली. मुलींनो दुर्बल नको.. निर्भय बना, अन्याय विरुद्ध लढा आणि स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहन करतच अभिनेता अक्षयकुमारने युवक -युवतींच्या मनाचा ठाव घेतला.महाराष्ट्र पोलिसांच्या युथ पार्लमेंट या कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमार हा शुक्रवारी साताऱ्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अकरा वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह खचाखच भरला होता.
अक्षयकुमारने सुरुवातीला एका छोट्या मुलीला व्यासपीठावर बोलविले. त्या चिमुकलीचा अक्षयकुमारने हात पकडला. त्यानंतर त्याने हिट मी, कमआॅन, असे म्हणून त्या मुलीला मारायला सांगितले. त्या मुलीनेही धाडस दाखवून अक्षयकुमारवर दोन ते तीन ठोसे लगावले. त्या मुलीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.अक्षयकुमारनेही त्या मुलीचे कौतुक करतच युवतींना संदेश दिला. अक्षयकुमारला म्हणाला, महिलांच्या नैसर्गिक प्रक्रियेबाबत आपल्याकडे फारसे बोलले जात नाही. त्यामुळे महिलांची प्रचंड कुचंबना होते. मासिक पाळीमध्ये महिलांना मंदिर आणि घरातील देवाऱ्यांजवळ प्रवेश दिला जात नाही, हे बरोबर नाही. प्रत्येकाने महिलांचा आदर राखला पाहिजेच.
यावेळी अक्षयकुमारने त्याच्या एका मित्राबाबत घडलेला एक किस्सा सांगितला. अक्षय म्हणाला, रात्री दीडच्या सुमारास माझ्या मित्राची बायको आणि तिची मुलगी खोलीमध्ये हळूहळू बोलत होत्या. मुलगी सांगत होती, आई मला पिरेड्स आले आहेत. काय करू तर आईने एवढ्या रात्री कुठे जायचे?, असा प्रश्न उपस्थित केला.
माझ्या मित्राला हे समजल्यानंतर त्याने पत्नीला सोबत घेऊन दुचाकीवरून सॅनिटरी नॅपकीन आणण्याठी ते दोघे गेले. काही वेळांनंतर त्यांनी घरी येऊन आपल्या मुलीला सॅनिटरी नॅपकीन दिले. आज त्या मुलीसाठी तिचे बाबा सुपरमॅन आहेत, अशी आठवणीही अक्षयकुमारने सगळ्यांना करून दिली.या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह साताऱ्यातील महाविद्यालयातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.