सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. यावेळी अक्षयकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल्यामुळे थोडक्यात श्रमदान करून तो निघून गेला. गेल्या दोन वर्षांत कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत पारितोषिके मिळविल्यामुळे गावोगावी चुरस निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचा परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून पंजाबच्या पार्श्वभूमीवरील ‘केशरी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अभिनेता अक्षयकुमारही याचेही यानिमित्ताने याठिकाणी सातत्याने येणे-जाणे सुरू आहे. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात भाग घेऊ, असा शब्द त्याने दिला होता. त्यानुसार बुधवारी पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात सहभागी होऊन अक्षयकुमारने आपला शब्द पाळला. तो मन लावून श्रमदान करत असताना काही तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. अखेर हा गोंधळ पाहून अक्षयकुमारने येथून जाणे पसंद केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हेही उपस्थित होते.
अक्षयकुमारच्या हाती खोरं ! पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात उत्साहाने सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 8:05 PM