आॅनलाईन लोकमतसायगाव : शिष्यवृत्ती परीक्षेचा जावळी पॅटर्न जावळी तालुक्याने निर्माण करून तो राज्यभर पोहचवला. तर आता संकलित व पायाभूत गणित चाचणीत तालुक्याने राज्यात पहिला तर सातारा जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्याने राज्यात द्वितिय क्रमांक पटकाविला. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे मार्फत घोषित करण्यात आलेल्या निकालात पायाभूत व संकलित चाचणी गणित विषयात राज्यात जावळीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील पहिल्या ५० केंद्रात जावळीतील केडंबे, खर्शी-बारामुरे, भणंग, दरे बुद्रुक केंद्राची कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे. गणितामध्ये केडंबे केंद्राने प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विशेष मार्गदर्शनाने तसेच प्राथमिका विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण विभागाला हे यश मिळाले आहे. त्याबद्दल शिक्षणाधिकारी यांच्यासह जावळीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, रवींद्र खंदारे, कामलकांत मेहेत्रे व सर्व गटशिक्षण अधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (वार्ताहर)
पायाभूत संकलितमध्ये जावळीचा राज्यात गजर
By admin | Published: March 22, 2017 1:25 PM