अंगापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावांमधील गणेशोत्सव म्हणजे भद्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी ‘दोरया म्हणा मोरया-मोरया, म्हणा दोरया,’च्या गजराने दोन्ही गावांतील परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाला राज्यभरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्र्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांपासून सुरू होता. या पाच दिवसांत श्रींच्या धार्मिक विधीबरोबरच कीर्तन व भजनाचे आयोजन करण्यात आले होते. चतुर्थी व पंचमी हे उत्सवातील मुख्य दिवस असल्याने या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरविली जाते. राज्यासह जिल्ह्यातील भाविक-भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या.गणेशचतुर्थीला सायंकाळी दोरेकऱ्यांचे आगमन गणपती मंदिरात झाले. या दोरेकºयांनी ‘दोरया म्हणा मोरयाऽ’चा गजर करत पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री बाराला श्रींची जन्मकाळ झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. भाद्रपद शुद्ध पंचमीला ग्रामदैवत एवर्जीनाथांच्या मंदिरात भदपात्र प्रज्वलित करून गेले महिनाभर अनुष्ठान केलेले हणमंत दीक्षित यांनी डोक्यावर घेऊन दोन्ही गांवाना तसेच मंदिरात पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यांच्यासोबत दोन्हीगावच्या श्रींच्या पालख्या घेऊन मानकरी सहभागी झाले होते. या प्रज्वलित भक्त पात्रात भाविकांनी धूप, ऊद, खारीक टाकून दर्शन घेतले. यात्राकाळात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हार, नारळ, मेवा, मिठाई, खेळणी, पाळण्याच्या दुकानांनी परिसर व्यापून गेला होता.
‘दोरया म्हणा मोरयाऽऽ’चा अंगापुरात भक्तांकडून गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:39 PM