सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेचे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असून, त्यामध्ये क्षारांचे प्रमाणही कमी आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी तपासणी अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. ही योजना ब्रिटिशकालीन असल्याने पूर्वी खापरी नळातून पाणी सातारा शहरात येत होते. कालांतराने खापरी नळांची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता पालिकेकडून शहापूर योजना सन २००४ साकारण्यात आली. उरमोडी नदीचे पाणी पंंपिंग करून ते जकातवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते.
सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूरचे पाणी जकातवाडी तर कासचे पॉवरहाऊस येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर साठवण टाक्यांतून नागरिकांना वितरीत केले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो शिवाय या पाण्याची प्रयोगशाळेत दैनंदिन तपासणीही केली जाते.
(पॉइंटर)
- १,२०,१९५ शहराची लोकसंख्या
- ११० लिटर प्रतिमाणसी दिले जाते पाणी
- ११ टाक्या पाणी वितरण करण्यासाठी
- २ जलशुद्धिकरण केंद्रे
(चौकट)
अशी हाेते तपासणी
- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची दैनंदिन तपासणी केली जाते. कर्मचारी आठवड्यातून एकदा पेठेत जावून नळाचे पाणी संकलित करतात.
- हे पाणी शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिले जाते.
- या ठिकाणी पाण्याच्या निरनिराळ्या तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत का, ते पिण्याजोगे शुद्ध आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते.
(चौकट)
वीस प्रभागांतून घेतले
जातात पाण्याचे नमुने
सातारा पालिकेकडून शहरातील वीस प्रभागांमधून पाण्याचे संकलन केले जाते. यासाठी पाणीपुरवठा विभागाने एक पथक नेमले आहे. जलशुद्धिकरण केंद्रातून पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जाते. त्यानंतर त्या नागरिकांना पुरवठा केला जातो. प्रत्येक पेठेतील पाणी आठवड्यातून एकदा घरातून संकलित केले जाते. हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून पुढे त्याची शुद्धता व इतर चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठविले जाते.
(कोट)
सातारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे नेहमीच प्रयत्न असतात. पाण्याची दैनंदिन तपासणी करून त्याचा अहवाल मागविला जातो. केवळ पावसाळ्यात काही दिवस दूषित पाणीपुरवठा होतो, मात्र पालिकेकडून याबाबतही खबरदारी घेतली जाते.
- यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती