सातारा,10 : सुरुचि बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांना अटक केव्हा होणार? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कायद्यासमोर सर्वजण सारखे आहेत, कोणालाही सोडणार नाही. तपासात निष्पन्न होईल तशी कारवाई करू. गुन्हे दाखलप्रकरणी तडजोड नाही, असा इशारा दिला. तसेच त्यांनी परिस्थिती योग्य हाताळल्याबद्दल पोलिसांचे कौतुकही केले.
येथील सातारा तालुका पोलिस ठाण्याजवळील शिवतेज सभागृहातील पत्रकार परिषदेत नांगरे-पाटील बोलत होते. जिल्ह्यात असणाºया ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणे व क्राईम मिटिंगसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी परिक्षेत्रातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गुन्हेगारी कारवाईची माहिती दिली.
परिक्षेत्रातील गुन्हेगारीविषयक माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी साताºयातील सुरुचि बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना बोलते केले. त्यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, मी आलो नाही याला कारण म्हणजे पोलिस अधीक्षक संदीप पाटील व त्यांच्या टीमने सर्व परिस्थिती योग्यरीत्या हाताळली. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो.
त्यारात्री आनेवाडी टोलनाका, शासकीय विश्रामगृह, सुरुचि बंगला अशा ठिकाणी तणावाची परिस्थिती होती. पण, पोलिसांनी समयसूचकता ठेवून परिणामकारकरीत्या काम केले आहे. प्रसंगी जीव धोक्यात घालून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणात काही गुन्हे वाढविण्यात आले आहेत.
आणखी काही गुन्हे दाखल होऊ शकतात का? याबद्दल सूचना करण्यात आली आहे. आता गुन्हा दाखल झाला असून, कोणत्याही परिस्थिती तडजोड केली जाणार नाही. कायद्याप्रमाणो सर्वांवर कारवाई होईल. तसेच परिस्थिती चांगली हातळल्याबद्दल बक्षीस देण्यासाठी पोलिस अधिकाºयांना प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.